रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

पुन्हा एकदा रतनगड !!!

२०१४ सालचा पावसाळा संपत आला तरी हवी तशी भटकंती झाली नव्हती, परिणामी लवकरच ट्रेकला जायचा असा आम्ही सर्वांनी ठरवला होता. इतर सर्वजण फार busy असल्यामुळे सरतेशेवटी फक्त मी आणि अविनाश आम्ही दोघेच ह्या ट्रेकसाठी तयार झालो आणि आम्ही जग्गू ला सांगून आमच्या जागा book करून ठेवल्या. शनिवारी रात्री सुमारे १ वाजता आम्ही कांजूरला दादर वरून येणारी शिखर वेध ची बस पकडली आणि मग सुरुवात झाली ती आमच्या रतनगड ट्रेकची….
बस मध्ये पोहोचतास अनेक जुने ट्रेक सवंगडी भेटले. दिनेश, अभी, सारिका ह्यांना भेटून जाम आनंद झाला. जुने सवंगडी भेटले आणि मग काय , गप्पा-टप्पाचा तास सुरु झाला . अनेक जुने विषय जुन्या ट्रेक्सच्या आठवणी असा आमचा प्रवास चालू होता. सुमारे ३ वाजता जग्गूने कसारा घाटाच्या अगोदर  काही वेळ गाडी थांबविली. तिकडे आम्ही थोडा वेळ थांबलो. तिथून निघाल्या नंतर मात्र आम्ही जग्गूला light बंद करायला सांगितलं आणि गप्प झोपून गेलो.
सकाळी डोळे उघडले तेव्हा गाडी साम्रदला पोहोचली होती . मग एक-एक करून सर्वजण खाली उतरले आम्ही पण आमच्या bags उतरवल्या. खाली उतरलो तर बऱ्यापैकी उजाडले होते. आकाशात निळ्या रंगात सोनेरी केशरी रंगाची झालर चढली होती. पण काही प्रखर तारे अजूनही आकाशात लुकलुकत होते. जग्गूने आमची राहण्याची सोय एका खोलीत केली होती आम्ही तिकडे काही वेळातच पोहोचलो नंतर फ्रेश होवून व change करून सर्वजण तयार झाले. इतक्यात आमचा नाश्ता देखील आला .गरमागरम पोह्यावर सर्वजण तुटून पडले. थंड वातावरणात गरमागरम पोहे आणि कडकडीत चहा हा एक वेगळाच अनुभव होता. एव्हाना समोरील डोंगररांगेतील खुटा सुळक्या मागुन सुर्य वर येत होता. पुढे सर्वजण एकत्र जमलो सर्वांनी आपली ओळख करून दिली, आणि मग सर्वांनी आगेकूच केली ती रतनगडाकडे …...

Photo credits Dinesh Navale

       सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घेत आम्ही आमची आगेकूच चालू ठेवली होती . सरळ वाटेवरून लागणारे ओढे आणि शेत पार करत करत आम्ही पुढे जात होतो .आमच्या समोरच भव्य असा खूटा सुळका दिसत होता. आम्ही त्याच दिशेने आमची आगेकूच चालू ठेवली. आता मात्र पठार संपून चढ चालू झाला होता . आता' चढताना थोडी धाप लागत होती .
वारा पण लागत नसल्याने अंगातून घामाच्या धारा सुटत  होत्या . सुमारे १५ मिनिटे सरळ वर गेल्यावर आम्हाला थोडी मोकळी हवा लागली. एका बाजूला कडा असल्याने येणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेमुळे थोडे बरे वाटले.  इकडून आम्हाला  पहिल्यांदाच आमच्या मागील कळसुबाई डोंगररांगेचा अभूतपूर्व असा नजारा दिसला. सुमारे ५ मिनिटे वर चालून गेल्यावर आम्ही आमचा पहिला ब्रेंक घेतला . सुमारे १५ मिनिटे आराम केल्यावर आम्ही  चढाई परत सुरु केली. आता सुर्य बर्यापैकी वर आला होत. आणि त्यातच तीव्र चढ असल्याने  चांगलीच  धाप  लागत होती. अजून काही काळ  सरळवर गेलो . जरी आम्ही झपाझप चढून वर असलो तरी आमचे बरेच साथीदार मागे राहिले होते. मग आम्ही आमच्या bags ठेवून थोडा वेळ आराम करायचे ठरवल. आमच्या समोरच कळसूबाई डोंगर रांग आणि भंडारदऱ्याचा सुंदर असा view दिसत होता. उतुंग कळसुबाई शिखर आणि बाजूलाच अलंग मलंग आणि कुलंग आणि खाली निळाशार असा भंडारदरा असे सुंदर दृश्य आम्ही डोळ्यात साठवून घेत होतो. 

Sudesh Adkar's photography
एव्हाना आमचे बाकीचे साथीदारही तिकडे पोहोचले. मग काही वेळ सर्वांनी आराम केल्यावर   आम्ही सर्वांनी आपली आगेकूच चालूच ठेवली.पुढे रस्ता थोडा निमुळता होत गेला. कडाच्या एका बाजूने काठावरून जायचा तो थरारक असा अनुभव होता तसेच इकडून रतनगड आता स्पष्ट दिसत होता. रतनगड डोंगररांगे मागून सूर्यप्रकाशाचा एक विलक्षण सुंदर असा कवडसा पडला होता. काही वेळ सरळ चालून गेल्यावर आम्हाला अजून एक चढ लागला चढ लहानसा असला तरी तिथून चढताना पायाखालील दगड सरकत होते त्यामुळे आमच्यातील अनेकांची चांगलीच तारांबळ उडत होती. एक एक करत हळू-हळू सर्वजण चढून वर गेले. एव्हाना दूर दिसणारा खुटा  सुळका आता फारच जवळ दिसत होता.  मागे असलेल्या निळ्याशार आकाशावर हिरवागार खुटा सुळका फारच विलोभनीय दिसत होता .

पुढे आम्हाला एक शिडी लागली .शिडी चढून गेल्यावर आम्ही उजवीकडे वळलो.आणि आमची आगेकूच चालूच ठेवली. दोनही बाजूला असणाऱ्या कमरेभर झुडुपातून जाताना मजा येत होती. जसजसा दूर दिसणारा रतनगड जवळ येत होता तसतसा आमचा उत्साह वाढतच जात होता . आता मात्र झपाझप पाऊले टाकत आम्ही पुढे निघालो . पुढे गेल्यावर आम्हाला सावलीचा भाग लागला. हा भाग अतिशय शांत होत. आणि तिथून समोर सुरेख असा View दिसत होता .मी मग माझी bags खाली ठेवून इकडेच थांबलो. त्या शांत वातावरणात, अंतरआत्म्याचा आवाज ऐकत  बसून समोरचे सृष्ट्री  सोदर्य न्याहाळणे हा स्वर्गीय असा अनुभव होता. इकडे आम्ही सुमारे २० मिनिटे बसलो मागून येणारे आमचे सर्व सहकारी पुढे निघून गेले तरी आम्ही इकडेच बसून होते . त्या शांत वातावरणातून निघावेसेच वाटत नव्हते . मात्र दुसरा काही इलाजच नव्हता त्यामुळे नाईलाजाने निघावेच लागले . पुढे काही पावलावरच आम्हा त्रंबक दरवाज्याकडे जाणाऱ्या प्रचंड अश्या पायऱ्या  लागल्या . ह्या सुमारे ५०-६० पायऱ्या असून ह्यातील एक एक पायरी सुमारे दीड फुटाची अहे. तसेच ह्या पायऱ्या सुमारे ८० अंशाच्या कोनात बांधलेल्या आहेत.


आम्ही मग एका मागोमाग एक असे , त्या पायऱ्या चढून गेलो. तीव्र चढ आणि उंच पायऱ्यामुळे चांगलीच धाप लागली होती पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही त्रंबक दरवाज्याजवळ पोहोचलो आणि मोहीम फत्ते झाल्याचा आनंद आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला मग आम्ही कल्याण दरवाजातून चढून वर रतनगडावर पोहोचलो . संपूर्ण रतनगडावर सोनकीच्या फुलांचा ताटवा उमलला होता . परिणामी संपूर्ण रतनगडावर पिवळ्या रंगाची चादर वसल्या सारखा वाटत होते . आमच्यातील अनेकांनी त्या फुलात फोटो काढून घेवून आपली हौस भागवून घेतली. मग आम्ही चढून वर असलेल्या नेढ्या मध्ये पोहोचलो. एव्हाना ११.३० वाजले होते. सकाळपासून चालून चालून आम्हा सर्वाना प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे सर्वांनी आपले डबे खोलून आणलेल्या जेवणावर ताव मारला. सर्वांनी आपले डबे इतरांबरोबर वाटून घेतले . जेवायला bread butter cheese sandwich, हिरवी चटणी, त्यावर चाट  मसाला शेवटी स्वीट डीश  म्हणून चोकलेट केक असा फक्कड बेत होता. जेवणं झाल्यानंतर आम्ही काही काळ तिकडे आराम करायचा ठरवलं म्हणून काही काळ नेढ्यातच थांबलो. आमच्यातील काही जणांनी तर नेढ्यातही फोटोग्राफीची संधी सोडली नाही इकडेही त्यांनी मनसोक्त फोटोस काढून घेतले . सुमारे १ वाजता मग आम्ही नेढ्यातून निघायचं ठरवलं. मग शिवाजी महाराजाची ललकारी देऊन जय भवानी जय शिवाजी म्हणत आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरु केला. नेढ्यातून उतरून आम्ही कात्राबाईच्या दिशेकडील वाटेने राणीच्या  हुड्या कडे निघालो. येथेही पावलोपावली सोनकीच्या फुलांचा सुंदर पिवळाशार असा ताटवा फुलाला होता. ``निळाशार आकाशाखाली हिरवागार डोंगर आणि त्यावर फुललेला पिवळ्या फुलांचा ताटवा ' असा माबन प्रसन्न करणार ते दृश्य होता हे निसर्गसौदर्य डोळ्यात आणी जमेल तसा कॅमेरात साठवत आम्ही पुढे निघालो.

Sudesh Adkar's photography
इकडून सरळ चालत गेल्यावर पाचच मिनिटात आम्ही राणीच्या हुड्याजवळ पोहोचलो .  गोलाकार असलेला राणीचा हुडा अनादि वर्षे उन पाऊस झेलत उभा आहे . तिकडून आम्ही सरळ चालत जावून जवळच असलेल्या कड्या जवळ गेलो . तिकडून कात्राबाईचा प्रचंड असा कडा दिसतो . सह्याद्रीचे ते अक्राळ - विक्राळ रूप बघून अंगावर कटाच उभा राहतो. मग आम्ही सावधपणे कडाच्या काठावरून झोपूनच दरीची खोली बघून घेतली.

Photo credits Avinash Phadtare
काही वेळ कड्याजवळ बसून राहिल्यावर काही वेळाने आम्ही पुढे निघालो. पुढे जावून आम्ही परत डावीकडे वळून खाली असलेल्या गुहेत पोहोचलो . इकडे पोहोचल्यावर आमच्यातील काही जण चक्क जमिनीवर आडवे होवून झोपून गेले . आम्हीही काही काळ इकडे आराम केला. इकडे गुहेत एक चहावाला होता मग आम्ही सर्वांनी एक एक चहाही घेतला. एव्हाना दुपारचे २ वाजले होते. आमच्यातील झोपलेलेही आता जागे झाले होते . मग पुढच्या पाचच मिनिटात सर्वजण तयार झाले . जग्गूने सागीतल्याप्रमाणे आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला सुरुवातीस आम्हाला एक मोठी शिडी लागली एक एक करून आम्ही ती शिडी पार केली .एक एक करून आम्ही सर्वजण खाली उतरले . आता मात्र काही जण पुढे होते तर काही जण मागे राहिले होते . आम्ही १० जण पुढे आलो होतो मग  जग्गूला आम्ही सांगितला कि आम्ही पुढे जातो आणि खाली असलेल्या ओढ्याजवळ थांबतो आणि पुढे निघालो . चढताना हत्तीप्रमाणे सावकाश चालणारे माझे सह ट्रेकर्स आता उधळलेल्या अश्वाप्रमाणे पळत होते. एका मागोमग एक ,एकमेकाशी गप्पा मारत हाहा म्हणता सुमारे अर्ध्या तासात आम्ही खाली ओढ्याजवळ पोहोचलो  आमच्यातील काही जण मग ओढ्यात हात पाय धुवायला गेले . मग मीही ओढ्यात हात पाय आणि तोंड धुवून घेतले .मग आमच्यातील काही जण पुढे निघाले तर काही जणांनी पाण्यात उतरणे पसंत केला. जरी आम्ही इकडे पोहोचले असलो तरी अजून आमच्या मागून येणाऱ्या आमच्या सह ट्रेकर्सचा काही पत्ता नव्हता. ह्या वरून एका गोष्टीचा अंदाज आला कि आपल्या कडे अजून बराच वेळ आहे . मग मी कॅमेरा आणि tripod काढून माझी सस्लो शटर  फोटोग्राफी चालू केली .मनासारखे एक दोन फोटोस मिळाल्यावर मी पुढे निघालो . कॅमेरा आणि tripod बाहेरच ठेवला होता . रस्तातून चालताना. जंगलातील त्या वाटेवरून चालताना दोन्ही बाजूला दिसणाऱ्या सुंदर दृश्याना कॅमेरात साठवत मी पुढे पुढे जात होतो . पुढे पोहोचल्यावर एका ठिकाणी मगाशी पुढे गेलेले आमचे सह ट्रेकर्स थांबलेले दिसले . त्यातील काही जण तेथे ओढ्यात अंघोळीसाठी गेले होते. इथे सुमारे गुढघाभर पाणी होते . पाणी अतिशय शांत आणि काचेसारखे स्वच्छ होते . पाण्याचा तळही  स्पष्टपणे दिसत होता मग मलाही पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही . मग कॅमेरा बाजूला ठेवून मी देखील पाण्यात उतरलो . पाणी बऱ्यापैक्की थंड होते .रणरणत्या उन्हातून थंड पाण्यात गेल्यावर अतिशय प्रसन्न वाटलं ट्रेकमुळे आलेला शीण थंड पाण्याबरोबर निघून जात होता. आम्ही सर्वानीच त्या पाण्यात मनसोक्त भिजून घेतला.


      सुमारे अर्ध्या तासाने आमचे ,मागे राहिलेले साथीदार  तिकडे पोहोचलो आम्हाला पाण्यात भिजताना पाहून तेही पाण्यात उतरले .  मग अजून काही वेळ पाण्यात घालवल्यावर आम्ही बाहेर आलो .मग कपडे बदलून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो . सरळ चालत सुमारे १० मिनिटातच आम्ही रतनवाडीत पोहोचालो .आमची बसही तिकडेच आली होती . मग आम्ही आमच्या Bags बसमध्ये ठेवल्या  आणि परत खाली उतरून जवळच असलेल्या अमृतेश्वर मंदिराकडे निघालो. काही क्षणातच आम्ही अमृतेश्वर मंदिरात पोहोचलो .अमृतेश्वर मंदिर संपूर्णपणे दगडात कोरलेले असून, ह्याची रचना हेमाडपंथी असून मंदिरात सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे.मग आम्ही अमृतेश्वराचे दर्शन घेतले .मंदिरात विलक्षण अशी प्रसन्नता आणि शांतता होती . काही काळ मंदिरात बसल्यावर आम्ही परत आमच्या बस जवळ आलो . एव्हाना सर्वजणांचे दर्शन करून झाले होते . मग आम्ही सर्व बस मध्ये चढलो आणि मग सुरु झाला आमचा परतीचा प्रवास मुंबईकडे,

आमची गाडी पुढे जात होती दूर डोंगरावर रतनगड दिसत होता , त्याला निरोप देताना मनात विचार येत होता लवकरच येवू तुझ्या भेटीला परत, तेव्हाही तू असशील इकडेच आमची वाट बघत , उनपावसाचा मारा झेलत, चंद्रसूर्याच्या साक्षीने , अनादी काळापर्यंत……

मंगळवार, ८ जुलै, २०१४

कोथळीगड प्रदक्षिणा

              201४ चा जून महिना संपायला आला तरी आमचा पाऊस हवा तसा चालू झाला नव्हता. परिणामी आमचा मान्सून ट्रेकचा प्लान देखील होत नव्हता. मात्र सह्याद्रीच्या वेड्यांना सह्याद्रीची ओढ ही कायमच लागलेली असते. त्यामुळे लवकरच ट्रेकला जायचा अस आम्हा सर्व मित्रांचं ठरल. सरतेशेवटी खूप मोठ्या चर्चेनंतर २९ जूनला आमचा कोथळीगडचा प्लान नक्की झाला. ठरल्याप्रमाणे मी २९ जूनला सकाळी ५. ५० ला भांडूप स्टेशनला पोहोचलो. तिकडे अविनाश आणि Daniel माझी वाट बघतच होते. मग आम्ही ६. १० ला CST वरून येणारी कर्जत ट्रेन पकडली. आमच्या आणखी तीन मित्रांनी ती ट्रेन अगोदरच घाटकोपरवरून पकडली होती ,पुढे आमचे अजून दोन मित्र कळव्याला चढले आणि सुरुवात झाली आमच्या कोथळीगड ट्रेकची.
              गप्पा टप्प्या नादात आमचा आमचा पुढचा प्रवास सुरु झाला होता खरा  मात्र आमच्या ग्रुप मधील एक निलेश पाटील यांनी ही ट्रेन पकडली नव्हती आणि ते फोनही उचलत नव्हते. त्यामुळे सर्वजण शांत होते. बहुतेक पाटलांचा हा ट्रेक चुकला असे आमच्या सर्वांचे मत झाले.अचानक माझा फोन वाजला आणि अपेक्षेप्रमाणे तो पाटलानचाच होता . "माझी ही ट्रेन चुकली आहे आणि मागून येणारी इंटरसिटी पकडून मी ८. १५ पर्यंत कर्जत ला पोहोचतो "असा पाटलांचा निरोप मिळाला आणि सर्वाना हायसे वाटल. आमचा प्रवास चालूच होता ज़ुने कॉलेजचे मित्र खूप दिवसांनी भेटले कि भूतकाळात गेलेल्या अनेक आठवणीना उजाळा मिळतो आणि मग वेळ कशी निघून जाते हे काळातच नाही.
             हा हा म्हणता सुमारे ७.४० ला आम्ही कर्जतला पोहोचलो. ट्रेन मधून उतरल्यावर आम्हाला  ST डेपोमध्ये जायचे होते. मग एक दोन जणांना आम्ही ST डेपो कुठे आहे असे विचारले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही कर्जत पूर्वेला येवून मुख्य रस्तावर मुंबईच्या दिशेने सरळ दहा मिनिटे चालत गेलो आणि आम्हाला ST डेपो भेटला. तिकडे आमच्यासारखे अजून काही ट्रेकर्स आले होते. तिकडून आम्हाला आंबिवलीला पोहोचायाचे होते. पुढे चौकशी केल्यावर असे कळले कि समोर उभी असलेली ST आंबिवलीला जाणार असून ८.३० वाजता सुटणार आहे. मग आम्ही धावतच ST मध्ये चढलो आणि सर्वजणांनी जागा पकडली. ST सुटायला अजूनही सुमारे अर्धा तास होता. आता अर्धा तास करायचं काय ह्या विचारात आम्ही सर्वजण ST मधून उतरलो. कर्जत डेपोच्या गेट वर एक वडापाववाला होता. मग काय आमच्या मधील सर्वजण वडापाववर तुटून पडले.एका हातात गरमागरम वडापाव आणि  दुसऱ्या हातात  कडकडीत चहाचा पेला असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता. प्रत्येकाने २-२ वडापाव रीचावाल्यानंतरच तृप्तीचा ढेकर दिला. एव्हाना सव्वा आठ वाजले होते. मागून आलेल्या कर्जत ट्रेन मधून अजून काही ट्रेकर्स कोथळीगडला जाण्यासाठी येत होते . मग आम्हीपण STमध्ये जाऊन बसलो. अजूनही आमचे पाटीलसाहेब पोहोचले नव्हते. मग आम्ही पाटीलना फोन केला, त्यांनी आता मी कर्जत स्टेशनाला आहे आणि १० मिनिटात पोहोचतो अस सांगितला आणि सुमारे १० मिनिटात पाटील पोहोचले.एव्हाना बस पूर्ण भरली होती. पुढच्या काही क्षणात बस आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. अधून मधून चढणाऱ्या माणसामुळे बस खचाखच भरली होती. एकमेकांची मस्करी करत आमचा प्रवास चालू होता. सुमारे एक तासात ९.४० ला आम्ही आंबिवलीला पोहोचलो.
       आंबिवलीला आम्ही उतरलो,पाहतो तर काय आमच्या सारखे अनेक ग्रुप तिकडे आले होते. समोरच असलेले हॉटेल संपूर्णपणे भरले होते. मग दुपारच्या जेवणाची सोय एखाद्या दुसऱ्या होते ठिकाणी होते का असा विचार करून आम्ही पुढे निघालो . पुढे एका ठिकाणी आमच्या दुपारच्या जेवणाची सोय झाली. तिकडे आम्ही पुढील रस्त्याची सर्व माहिती विचारून घेतली. आणि आम्ही आमची आगेकूच चालू ठेवली .
              सुमारे पाच मिनिटे सरळ चालल्यानंतर एक कच्चा रस्ता लागला. आम्ही तो रस्ता पकडून पुढे चालू लागलो .आता थोडा चढ चालू झाला होत. आम्ही रमत-गमत ,फोटो काढत काढत पुढे चालू लागलो . सुमारे अर्धा तास पुढे गेल्यावर आम्ही आमचा पहिला stop घ्यायचा ठरवला .१५ मिनिटे बसायचा अस ठरला . मग सर्वांनी आपल्या BAGS  खाली  ठेवल्या. डब्यातले सुके खाणे बाहेर काढले आणि सर्वांनी त्यावर यथेछ ताव मारला. इथे पण आम्ही एखाद-दोन फोटो काढायची संधी सोडली नाही. 
     
Photo credits Sudesh Adkar
आता सुमारे १०
.३० वाजले होते. सुर्य चांगलाच वर आला होता. आकाशात ढग असले तरी पावसाने दडी मारली होती. उन मात्र चांगलेच तापले होते.आम्ही मात्र आमचा पुढचा प्रवास असाच चालू ठेवला. गप्पा टप्पा,एकमेकांची मस्करी,मधेच थांबून एखादा फोटो काढ असा आमचा क्रम चालू होता.  सुमारे ११. १५ ला आम्ही डोंगराच्या वरील भागात पोहोचलो आणि आम्हाला प्रथम दर्शन झाले ते कोथळीगडाचे  उंच डोंगरावर असणारा कोथळीगडाचा सुळका फार आकर्षक दिसत होता. तसेच कोथळीगडाच्या पायथ्याशी असलेले पेब गाव व त्यातील घरे टुमदार दिसत होती. तसेच आपल्याला अजून इतके अंतर कापायचे आहे ह्याची आम्हाला जाणीव झाली.
Photo credits Nilesh Patil

               इकडे आम्ही थोडा वेळ थांबलो. डोंगरमाथा आणि पठार असल्याने वाराही छान सुटला होता. इकडेही आम्ही सर्वांनी आपली फोटोग्राफीची हौस भागवू घेतली. सुमारे १० मिनिटे बसल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. अजूनही आमचा प्रवास पठारावरूनच होत होता. तीव्र चढ अजूनही लागला नव्हता. मात्र ऊन कडक असल्याने थोडा त्रास जाणवत होता. सुमारे २० मिनिटे सरळ चालत गेल्यावर आम्ही कोथलिगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. एव्हाना दुपारचे पावणे बारा वाजले होते आणि आता आकाशातही जास्त ढग नव्हते. परिणामी ऊन चांगलेच लागत होते. मात्र ह्याच वेळी आम्हाला एक लिंबू सरबतवाला भेटला आणि आमच्यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भर वाळवंटात झरा मिळाला असा आनंद उमटला. प्रत्येकी दोन दोन ग्लास चढवल्यावर सर्वजण तृप्त झाले. पुढे गावात पाण्याच्या बाटल्या घेवून आम्ही पुढे निघालो. आता मात्र पठार संपून तीव्र चढ चालू झाला होता. आजूबाजूला झाडी थोडी दाट होती. आम्ही झाडीतून मार्ग काढत वर चढू लागलो. वरून खाली येणाऱ्या ट्रेकर्सना वाट देत आम्ही आमची चढाई चालूच ठेवली. तीव्र चढ असल्याने धाप चांगलीच लागत होती. अर्ध्यातासाच्या चढाई नंतर आम्हांला किल्लाची ढासळलेळी तटबंदी दिसली.

Photo credits Nilesh Patil

       पुढच्या ५ मिनिटात आम्ही किल्ल्यावरच्या गुहेत पोहोचलो आणि आपल्या BAGS खाली टाकून सरळ जमिनीवर आडवे झालो. सरळ चढ चढून आल्यामुळे सर्वाना प्रचंड धाप लागली होती. काही काळ पडल्यावर अंगात आलेला क्षीण निघून गेलाकिल्ल्यावरील गुहा प्रशस्त असून आतमध्ये देवाच्या मूर्ती आढळतात. तसेच गुहेतील खांब नक्षीदार असून त्यावर कोरीवकाम केलेलं आढळते. आम्ही इकडे काही वेळ थांबलो आणि नंतर  अजून वर सूळक्याच्या माथ्यावर जायला निघालो. 
Photo credits Sudesh Adkar

       आमच्या माहितीप्रमाणे कोथळीगडाच्या सुळक्यावर जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत असे आम्हाला माहित होते .मग आम्ही गुहेतून बाहेर पडून डावीकडे गेलो आणि वरती चढलो . मात्र तिकडे गेल्यावर आमच्या लक्षात आला कि तिथून वर जायला रस्ता नाही . मग आम्ही परत खाली उतरलो आणि परत डावीकडे वळून पुढे वरती जायच्या रस्त्याच्या शोधात पुढे जावू लागलो. मात्र आमच्या ह्या निर्णयामुळे पुढे आम्हाला एका थरारक अनुभवला सामोरे जावे लागले . आम्ही पुढे पुढे जात राहिले.तिकडे आम्हाला कोथळीगडावर असलेले पाण्याचे काही टाके दिसले ह्यातील काही टाके भरलेले तर काही पूर्णपणे कोरडे आहेत. पुढे काही टाके पार करताना आम्हाला चांगलीच  कसरत करावी लागली कारण तिकडे अतिशय निमुळता रस्ता होता ज़ेमतेम एक माणूस जाईल एवढीच जागा होता.
Photo credits Sudesh Adkar

      आता मात्र आम्ही कोथळीगडाच्या मागच्या बाजूला पोहोचलो. अजूनही आम्हाला वरती जायचा रस्ता मिळत नव्हता मग आम्ही अजून पुढे निघालो. मात्र इकडे आम्हाला एक थरारक ROCKPATH लागला. इकडून जायला जेमतेम अर्धा पाऊल जायला जागा होती. एका बाजूला असलेल्या खोल दरीकडे पाहून पोटात गोळा येत  होता. आम्ही कापरीचा आधार घेत हळू हळू एका मागोमाग एक असा तो rockpatch पार केला.
Photo credits Sudesh Adkar
      अजूनही वर जायचा रस्ता दिसत नव्हता. आम्ही अजून पुढे चालत राहिले आणि नंतर आमच्या लक्षात आला कि आम्ही परत जिकडून सुरुवात केलेली त्या गुहेच्या बाजूलाच येवून पोहोचलो. ह्या प्रयत्नात आमची कोथळीगडाला एक संपूर्ण प्रदक्षिणा घालून झाली होती. आता मात्र आम्ही २ मिनिटे तिकडेच थांबलो. नीट बघितल्यावर आमच्या असे लक्षात आले की गुहेला लागुनच डावीकडे , वरती जायला पायऱ्या आहेत . मग आम्ही हळू हळू त्या पायऱ्या चढू लागलो. वरती जायला असणाऱ्या पायऱ्या दगडात कोरलेल्या असून प्रत्येक पायरी सुमारे एक एक फुटाची आहे. ह्या पायऱ्या गोलाकार जिन्याप्रमाणे कोथळीगडाच्या आतून वर वर जाण्यारा आहेत. आम्ही एक एक पायरी कापत वरती जावू लागलो,

Photo credits Sudesh Adkar

            पुढे काही ठिकाणी ह्या  पायऱ्या अतिशय निमुळत्या आहेत.एका बाजूला असलेली दरी आणि त्यात निमुळत्या पायऱ्या असा आम्हाला थरारक अनुभव आला. सरते शेवटी आम्ही शिखरावर पोहोचलो आणि आपली कोथळीगडाची  मोहीम फत्ते झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वरती मस्त वर सुटला होता तसेच तिकडून भीमाशंकर डोंगररांग ,पदरगड  आणि  तुंगी गावाचा सुंदर नजारा दिसतो आम्ही मग तो सुंदर नजारा जमेल तेवढा डोळ्यात साठवून घेत होतो.
             एव्हाना दुपारचे दोन वाजले होते.आणि आम्हाला कळल्याप्रमाणे आंबिवली वरून कर्जतला जाणारी ST संध्याकाळी सुमारे ५.०० ला असते.आम्हाला ती पकडायची होती तसेच आम्ही आमचे दुपारचे जेवण खाली आंबिवली गावात सांगितले होते त्यामुळे आमचे जेवणही बाकी होते .मग आम्ही लगेचच खाली उतरायचा निर्णय घेतला आणि धावत धावत उतरायला सुरुवात केली सुमारे २० मिनिटात आम्ही पेठ गावात पोहोचलो. आम्ही ठरवले होते कि न थांबता उतरायचे . आम्ही आमचा परतीचा प्रवास असाच चालू ठेवला होता. आता मात्र कडक उन पडले होते . उन्हाच्या झळा चांगल्याच लागत होत्या. आणी त्यातच आमच्या कडील पाणीही संपले होते . त्यामुळे उतरताना आमची चांगलीच वाट लागली होती. सलग दीड तास चालल्यावर सुमारे ३. ३० ला आम्ही खाली आंबिवलीला पोहोचलो . तिकडे आम्ही मग ज्या घरात जेवणाची ORDER दिली होती त्या घरात गेलो. BAGS जमिनीवर टाकून,हाथ पाय धुवून गरमागरम जेवणावर ताव मारला. जेवण केल्यावर काही काळ आराम केल्यावर आम्ही परत निघण्यासाठी ST  थांब्यावर आलो. तिकडे आमच्या सुदेवाने कर्जतला जाणाऱ्या ६ आसनी रिक्षा उभ्या होत्या. मग आम्ही रिक्षा पकडून परत कर्जत कडे निघालो.
             रिक्षात बसल्यावर मनात अनेक विचार तरळत होते . मनात कोथळी गडाची मोहीम सफल झाल्याचं आनंद होताच. त्याच बरोबर डिसेंबर मध्ये कोथळीगडाचा night ट्रेक करायाचं असा विचारही पक्का केला .
ता. क .
१. पावसाळी ट्रेक असला तरी उन्हापासून बचाव करणारी टोपी आणि स्किन नेहमी बरोबर ठेवावी हि महत्वाची गोष्ट आम्हाला कोथळीगडाच्या ट्रेक वरून कळली .
२. कोठलीगड ट्रेकला जेवणाची सोय पायथ्याशी असलेल्या पेठ या गावात होते त्यामुळे खाली आंबिवलीला जेवणाची ओर्देर देण्याची गरज नाही.


शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

रम्य , स्वर्गीय ,गूढ ,थरारक - भीमाशंकर !!!

         २७  जुलेच्या रात्री आम्ही   जण  ऐरोली ब्रिज जवळ जमलो आणि कांजूर वरून येणाऱ्या बसची वाट बघत होतो. आमचा मित्र सुरूवातीलाच  बस मध्ये चढणार होता, तर अजून जण कामोठे पनवेलला चढणार होता. काही वेळ वाट बघितल्यावर आमच्या मित्राचा फोन आला कि बस कांजूर वरून निघाली आहे आणि मग पुढच्या काही वेळातच आमची बस तिकडे पोहोचली . मग आम्ही बस मध्ये चढलो आणि सुरुवात झाली ती आमच्या भीमाशंकराच्या ट्रेकची !!!! काही वेळातच पनवेल जवळ आमचा अजून मित्र बस मध्ये चढला . अश्याच रीतीने - करत सार्वजन बस मध्ये चढले आणि बस फुल भरली मग बस थांबता भीमाशंकऱकडे निघाली .सर्व लाइट बंद झाल्यावर आम्ही बसमध्ये मस्त ताणून दिली                    

       सकाळी "अरे आपण खांडसला पोहोचलो, आता उठा " ह्या आवाजाने डोळे उघडले आणि मग आम्ही डोळे चोळत बस मधून उतरलोपाउस चिरचिर पडत होता त्याच बरोबर हवेत प्रचंड गारवा होता . तिकडे नश्त्याची सोय केली होतीत्या थंडीत गरमागरम उपमा आणि चहाची चव औरच लागत होती . नाश्ता केल्यावर आम्ही आमच्या bags आम्ही बस मधून उतरवल्या. आमचा संपूर्ण ९० जणाचा ग्रुप निघायला तयार  झाला . जग्गू ने आम्हाला योग्य त्या सूचना दिल्या आणि मग सुरुवात झाली ती एका थरारक ट्रेकची .
Photo credits Pritesh Pandya

           आम्ही फोटो काढत काढत पुढे चाललो होतो  कुंद हवेतून पुढे जाताना गारवा  जाणवत होता.सुमारे १५ मिनिटे सरळ रस्त्या वरून चालल्या नंतर आम्हाला एक प्रचंड मोठा ओढा लागला . आमच्यातील अनेक जननी त्यात मनसोक्त भिजून घेतला . ओढाच्या पाण्याचा  वेग प्रचंड होता त्याचे ते रोद्र रूप पाहून मला माझा फोटोग्राफीचा मोह आवरता आला नाही ,मी त्याचे ते रोद्र रूप माझ्या कॅमेरात साठ्वाय्कॅच प्रयत्न केला  मग ओढ्यावर टाकलेल्या एक मोठ्या ओंडक्याचा आधार घेत आम्ही तो ओढ पार केला.
                       आम्ही तो ओढ पार करून पुढे गेलो ,मात्र नंतर अस लक्ष्यात आल कि फोटोग्राफीच्या नादात आम्ही फक्त १०  जणच मागे राहिलो आहोत आणि बाकी सर्व ग्रुप पुढे निघून गेला आहे. आता मात्र आम्ही झपाझप पावले टाकायला सुरुवात केली मनात  फक्त एकाच विचार होता कि काहीही करू पुढे गेलेल्या आपल्या ग्रुपला गाठायचे . आम्ही झपाझप चाललो होतो मात्र पुढील मिनिटातच गोष्ट लक्षात आली कि ग्रुप ला गाठायच्या नादात आपण रस्ता चुकलो आहोत . आता आम्ही तिकडेच थांबलो सर्वांनी निर्णय घेतला कि परत मागे फिरायचे , मग आम्ही मागे फिरलो आमच्या सुदेवाने आमचा सूत्रसंचालक स्वप्नील खिंडारे मागून येतच होता मग त्याने आम्हाला योग्य रस्ता दाखवला , आणि मग आमची आगेकूच सुरु झाली  आता मात्र पठार संपून तीव्र चढण  चालू झाली होती..कुंद हवेतून वर चढताना धाप लागत होतीचढणीचा रस्ता इकडे फारच तीव्र होता . सुमारे २० मिनिटे चढल्या नंतर आम्हाला मोठी शिडी दिसली .  सुमारे ३० फुट लांब असलेली हे शिडी पूर्णपणे कडयाच्या काठावर आहे . शिडीवरून चालताना हे शिडी हलत असते . ह्या शिडीवरून चालून जाताना एक थरारक अनुभव अल. सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही एका वेळेला केवळ जणांनीच हे शिडी पार केली.
Photo Credits Nilesh Patil

                             शिडी पार केल्यावर लगेचच एक  छोटा rock-patch लागतो .patch छोटाच असला तरी वरून येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता अतिशय निसरडा झाला होता . आणि  एका बाजूला खोल दरी असल्यामुळे आम्ही अतिक्षय काळजीने तो patch  पार केला . पुढे आम्हाला एक छोटी गुहा दिसली . गुहेच्या बाजूलाच वरून कोसळणारा धबधबा देखील होता . आम्ही गुहेमध्ये १०  मिनिटे विश्रांती घेतली . माझ्या काही मित्रांनी इकडे पण धबधब्यात भिजायची संधी सोडली नाही.नंतर मग आम्ही आमची आगेकूच चालूच ठेवली. लगेचच आम्हाला आणखी एक शिडी लागली सुमारे १० फुट उंच अशी हि शिडी जवळपास काटकोनात लावलेली होती . ह्या शिडी वरून आम्ही वर चढून गेलो
Photo credits Pritesh Pandya

                    त्याच्या नंतर लगेचच पुढे लागून  एक rock patch होता . तिकडे लावलेल्या रोप चा आधार घेत आम्ही वर चढलो . रोप असल्यामुळे आम्ही पुढे जावू शकलो . रोप शिवाय हा patch करणे फार धोकादायक आहे. आम्ही मिनिटे पुढे जातो जातो तोच आणखी एक rock patch लागला . हा patch अतिशय तीव्र होता आणि इकडे रोप देखील लावली नव्हती . मग कपारीतील जागांचा आधार घेत आम्ही वर चढलो आणि तो patch पार केला
Photo Credits Nilesh Patil

                   तिकडून थोडे पुढे गेल्यावर आम्हाला अजून एक धबधबा लागला . आणि आम्ही परत त्यात भिजून घेतला. मग आम्ही परत पुढे निघालो . काही वेळातच चढण संपून पठार चालू झाल होत . मग पुढच्या काही वेळातच आम्ही पदरवाडी ह्या गावात पोहोचलो . आता मात्र माही सर्वांनी दहा मिनिटे थांबायचं ठरवला . १० मिनिटातच आमच्या ग्रुप मधले मागे राहिलेले सार्वजन तिकडे पोहोचले . मग आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरु केला .  आता पर्यंत साफ असलेला परिसर आता संपूर्णपणे धुक्याने दाटून आला होता . धुके इतके गडद होते कि दोन हातावर चालणारा माणूस देखील दिसत नव्हता . पुन्हा चालू झालेली चढण चढत -चढत आम्ही आपली आगेकूच चालूच ठेवली. संपूर्णपणे दाटलेले धुके, अतिशय दाट जंगल आणि ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणे केवळ अशक्य झाले होते . दुपारचे १२ वाजता संध्याकाळचे वाजल्याचा भास होत होता.
Photo Credits Pritesh Pandya

            एकमेकांना मदत करत आम्ही ते जंगल पार केले आणि मग परत एकदा पठार चालू झाले . संपूर्ण पठारावर धुक्याची चादर पसरली होती .कोणत्या दिशेने जायचे हे देखील करत नव्हते . मग पुढे चालणाऱ्या लोकाच्या मागो-माग आम्ही चालू लागलो .पुढच्या १० मिनिटातच आम्ही भीमाशंकर मंदिराच्या जवळच पोहोचलो . आता मात्र मंदिर आणि आमच्या मध्ये केवळ काही पायऱ्याचेच अंतर बाकी होते . मग आम्ही झपाझप पायऱ्या उतरत मंदिराबाहेर पोहोचलो . तिकडे आमचा मित्र सागर मंदिरा बाहेर आराम करत बसला होता. मग आमचे बूट आणि bags तिकडे काढून आम्ही मंदिराकडे निघालो . मंदिराकडे जायला फारशी लांब रांग  नव्हतीपुढच्या १०  मिनिटातच आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला . वातावरण संपूर्णपणे भक्तिमय झाले झाले होते. बाजूला चाललेले मंत्रपठण मंत्रमुग्ध करणारे होते मंदिरात केलेले नक्षीकाम लक्ष वेधून घेत होते. आम्ही दर्शन करून घेतले आणि गाभाऱ्यातील जागेत बसलो . उद्बतीचा सुगंध ,संपूर्णपणे दाटलेले धुके ,चीर-चीर  पडणार पाऊस ह्यामुळे प्रत्यक्ष स्वर्गात बसल्याचा भास होत होता . डोळे बंद करून शिव- शंभुचे नाव घेतले आणि त्याच क्षणी एक एक स्वर्गीय अशी मनशांती मिळाली. आता पर्यंत आलेला क्षीण कुठच्या कुठे पळून गेला होता.
Photo Credits Nilesh Patil

         मंदिराच्या बाहेरच एक मोठी घंटा बसवली आहे . ह्या घंटेबद्दल 'चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसईहून आणलेली घंटा -१७२९ 'असे लिहिलेले आहे. आम्ही आता तिकडून निघालो . बाजूला प्रसादची दुकाने आहेत . घरातून माफी आणी पुढच्या ट्रेकला परवानगी मिळावी म्हणून तिकडच्या दुकानातून प्रसाद विकत घेतला.  एव्हाना प्रचंड भूक लागली होती. जगदीशने जवळच असलेल्या हॉटेल क्षितिज मध्ये जेवणाची सोय केली होती. शुध्द-शाकाहारी थाळी समोर येताच आम्ही त्यावर तुटून पडलोजेवण घरगुती आणि अतिशय रुचकर होते आमचे जेवण झाले होते मात्र आमच्या ग्रुप मधील काही जनाचे जेवण होणे बाकी असल्याने  आम्ही परिसर फिरायला निघालो . संपूर्णपणे धुक्याने दाटलेल्या परिसरात फिरायला मजा येत होती . जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर आम्ही चहा घेतलाअतिशय थंड वातावरण आणी त्यात गरमागरम कडकडीत चहा बस यार !!!!! अवर्णनीय .
                     एव्हाना सर्वांचे जेवण झाले होते .अर्ध्या ग्रुप ने उतरायला सुरुवात केली होती . मग जग्गू ने आम्हाला देखील निघायची सूचना केली . उतरायचा वेळी आम्ही गणेश घाटाने उतरणार होतो . गणेश घटने उतरताना पदरवाडी पर्यंत येतानाचाच रस्ता पकडावा लागतो . आता आम्ही झपाझप उतरत निघालो होतो. उतरताना आमचा वेग फारच वाढला होता . सुमारे २० मिनिटातच आम्ही पदरवाडीत येवून पोहोचलो .तिकडे सुमारे पाच मिनिटे आम्ही मागून येणाऱ्या सर्वाची वाट  बघितली .  मग सुरुवात केली ती गणेश घाटाने परतीच्या प्रवासाची !गणेश घाटाचा रस्ता सरळ आणी सोपा आहे .ह्या रस्तावर दोन्ही बाजूला घनदाट जंगल असून वातेन आपल्याला अनेक छोटे- छोटे ओढे लागतात . आम्ही आता झपाझप चाल निघालो होतो . मी आणी माझा मित्र राहुल मधेच एखादा ओढा लागला कि तिकडे थांबत असू . कॅमेरा TRI-POD लावून आमची LONG EXPOSURE फोटोग्राफी चालू होती
Sudesh Adkar Photography
      
            आम्ही फोटो घ्यायला थांबलो  की  आमचा ग्रुप पुढे निघून जात असे आणी मग आम्ही धावत धावत जावून त्यांना मागून गाठत असू . असा आमचा क्रम चालू होता. सुमारे दीड तास आम्ही त्या गर्द जंगलातून चालत होतो. नंतर आम्हाला अजून एक प्रचंड मोठा असा धबधबा लागला  इकडेही आमच्यातील काही जणानी  भिजून घेतले .मात्र चार वाजत आले असल्याने जास्त वेळ कोणी पाण्यात थांबला नाही . धबधबा पार करून आम्ही पुढे गेलो . आता मात्र दोन्ही बाजूनी असलेले घनदाट जंगल संपले होते . आता एका बाजूला खोल दरी दिसत होती बाजूच्या डोंगरावरून कोसळणारे शुभ्र पाण्याचे प्रपात आम्हाला दिसत होतो .  मी ते नयनरम्य दृश्य माझ्या कॅमेरात साठवत पुढे चाललो होतो.  सुमारे १० पुढे गेल्यवर आमच्या उजव्या बाजूला आम्हाला प्रचंड असा शिडी घाट दिसला त्यात आम्ही चढून गेलेलो शिडी दिसलीउंचावरून कोसळणाऱ्या  अजस्त्र पप्रतासमोर ती शिडी एखाद्या कस्पटाप्रमाणे भासत होती काही क्षण तर विश्वासच बसत नव्हता कि आपण इकडूनच चढून गेलो . मनात विचार आला कि निसर्गाच्या कुशीत डोंगरमाथ्यावर वसलेल्या शिव-शंभुनेच आम्हा पामरांना हा अक्राळ -विक्राळ  घाट ओलांडण्याचे सामर्थ दिले . निसर्गाचे हे रूप शक्य होईल तितके डोळ्यात आणि कॅमेरात साठवत आम्ही पुढे निघालो .
Sudesh Adkar Photography

                 आम्ही आमचा परतीचा प्रवास चालूच ठेवला . आता परत पठार चालू झाले होतो . आता त्या पठारावरून आम्ही झपाझप चालू लागलो काही वेळ पुढे गेल्यावर आम्हाला आमच्या डाव्या वाजूला उंच असा पदरगड दिसला . उतुंग असा पदरगड काही क्षण दिसे आणि पुढच्या क्षणातच तो धुकाच्या चादरीत शकल जाई . निसर्गाचा हा लपंडाव पाहतच आम्ही  पुढे निघालो . आणि पुढच्या काही वेळातच इतका वेळ बंद असलेला पाउस पुन्हा धो -धो कोसळू लागला . आम्ही मात्र पुढे चालतच होतो . काही वेळाने मात्र आम्हाला रस्ते लागले सरळ समोर पायवाट होती . तर दुसरी पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली वाट होती . इकडे मात्र आम्ही चांगलेच गोंधळलो सरळ दिसणारी पायवाट पकडावी कि पाण्याने तयार झालेली वाट पकडावी हे काळात नव्हते . काय माहित हे पाण्याची वाट पुढे जावून एखाद्या धबधब्यात संपेल . आता मात्र आम्ही इकडेच थांबायचा निर्णय घेतला आणि मागून येणाऱ्या जग्गू ची वाट बघत बसलो . काही वेळातच जगदीश तिकडे आला आणि त्याने सांगितला कि पाण्याची वाट योग्य आहे. मग आम्ही ती वाट पकडून सरळ उतरायला सुरुवात केली . पुढील काही वेळातच आम्ही खांडसच्या गणेश मंदिरात पोहोचलो .तिकडे मंदिरात देव पुढे मत टेकवला आणि सरळ उतरायला सुरुवात केली . उतरताना दूर आम्हाला आमच्या बसेस दिसल्या आणि मग अंगात वेगळाच जोश चढला . माझ्या बरोबर चाललेल्या राहुलला मी म्हणालो तू येमी पळतो . असा म्हणत मी सरळ पळत सुटलो आणि आमच्या बस जवळच येवून थांबलो  मागे नजर टाकली बघतो तर आक्राळ-विक्राळ शिडी घाट आणि  आम्ही उतरलो तो गणेश घाट दिसत होता मनात विचार आला कि असेल मी नसेन मी मात्र तू असशीलच , मी असलो तर नक्की परत येईन तुझ्या भेटीला !!!!!!

ता. .

भीमाशंकरचा ट्रेक , खास करून शिडी घाटाने  करताना  थोडा कठीण आहे . त्यामुळे तो करताना सर्व माहिती असलेल्या ग्रुप बरोबरच करावा .

. गणेश घाटाने उतरताना रस्ता सोपा असला तरी खूप लांब आहे त्यामुळे उतरताना शक्य असेल तेवढा जास्त वेग कायम ठेवावा .

. उतरताना फार शेवटी लागणाऱ्या दोन रस्त्यापेकी खाली येणारा रस्ता पकडावा , इकडे वाट चुकण्याची शक्यता फारच जास्त आहे त्यामुळे गोंधळून गेल्यास आपला लीडर येण्याची वाट  बघावी , एकट्याने तर ह्या रस्तावरून चुकूनही जावू नये