रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

पुन्हा एकदा रतनगड !!!

२०१४ सालचा पावसाळा संपत आला तरी हवी तशी भटकंती झाली नव्हती, परिणामी लवकरच ट्रेकला जायचा असा आम्ही सर्वांनी ठरवला होता. इतर सर्वजण फार busy असल्यामुळे सरतेशेवटी फक्त मी आणि अविनाश आम्ही दोघेच ह्या ट्रेकसाठी तयार झालो आणि आम्ही जग्गू ला सांगून आमच्या जागा book करून ठेवल्या. शनिवारी रात्री सुमारे १ वाजता आम्ही कांजूरला दादर वरून येणारी शिखर वेध ची बस पकडली आणि मग सुरुवात झाली ती आमच्या रतनगड ट्रेकची….
बस मध्ये पोहोचतास अनेक जुने ट्रेक सवंगडी भेटले. दिनेश, अभी, सारिका ह्यांना भेटून जाम आनंद झाला. जुने सवंगडी भेटले आणि मग काय , गप्पा-टप्पाचा तास सुरु झाला . अनेक जुने विषय जुन्या ट्रेक्सच्या आठवणी असा आमचा प्रवास चालू होता. सुमारे ३ वाजता जग्गूने कसारा घाटाच्या अगोदर  काही वेळ गाडी थांबविली. तिकडे आम्ही थोडा वेळ थांबलो. तिथून निघाल्या नंतर मात्र आम्ही जग्गूला light बंद करायला सांगितलं आणि गप्प झोपून गेलो.
सकाळी डोळे उघडले तेव्हा गाडी साम्रदला पोहोचली होती . मग एक-एक करून सर्वजण खाली उतरले आम्ही पण आमच्या bags उतरवल्या. खाली उतरलो तर बऱ्यापैकी उजाडले होते. आकाशात निळ्या रंगात सोनेरी केशरी रंगाची झालर चढली होती. पण काही प्रखर तारे अजूनही आकाशात लुकलुकत होते. जग्गूने आमची राहण्याची सोय एका खोलीत केली होती आम्ही तिकडे काही वेळातच पोहोचलो नंतर फ्रेश होवून व change करून सर्वजण तयार झाले. इतक्यात आमचा नाश्ता देखील आला .गरमागरम पोह्यावर सर्वजण तुटून पडले. थंड वातावरणात गरमागरम पोहे आणि कडकडीत चहा हा एक वेगळाच अनुभव होता. एव्हाना समोरील डोंगररांगेतील खुटा सुळक्या मागुन सुर्य वर येत होता. पुढे सर्वजण एकत्र जमलो सर्वांनी आपली ओळख करून दिली, आणि मग सर्वांनी आगेकूच केली ती रतनगडाकडे …...

Photo credits Dinesh Navale

       सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घेत आम्ही आमची आगेकूच चालू ठेवली होती . सरळ वाटेवरून लागणारे ओढे आणि शेत पार करत करत आम्ही पुढे जात होतो .आमच्या समोरच भव्य असा खूटा सुळका दिसत होता. आम्ही त्याच दिशेने आमची आगेकूच चालू ठेवली. आता मात्र पठार संपून चढ चालू झाला होता . आता' चढताना थोडी धाप लागत होती .
वारा पण लागत नसल्याने अंगातून घामाच्या धारा सुटत  होत्या . सुमारे १५ मिनिटे सरळ वर गेल्यावर आम्हाला थोडी मोकळी हवा लागली. एका बाजूला कडा असल्याने येणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेमुळे थोडे बरे वाटले.  इकडून आम्हाला  पहिल्यांदाच आमच्या मागील कळसुबाई डोंगररांगेचा अभूतपूर्व असा नजारा दिसला. सुमारे ५ मिनिटे वर चालून गेल्यावर आम्ही आमचा पहिला ब्रेंक घेतला . सुमारे १५ मिनिटे आराम केल्यावर आम्ही  चढाई परत सुरु केली. आता सुर्य बर्यापैकी वर आला होत. आणि त्यातच तीव्र चढ असल्याने  चांगलीच  धाप  लागत होती. अजून काही काळ  सरळवर गेलो . जरी आम्ही झपाझप चढून वर असलो तरी आमचे बरेच साथीदार मागे राहिले होते. मग आम्ही आमच्या bags ठेवून थोडा वेळ आराम करायचे ठरवल. आमच्या समोरच कळसूबाई डोंगर रांग आणि भंडारदऱ्याचा सुंदर असा view दिसत होता. उतुंग कळसुबाई शिखर आणि बाजूलाच अलंग मलंग आणि कुलंग आणि खाली निळाशार असा भंडारदरा असे सुंदर दृश्य आम्ही डोळ्यात साठवून घेत होतो. 

Sudesh Adkar's photography
एव्हाना आमचे बाकीचे साथीदारही तिकडे पोहोचले. मग काही वेळ सर्वांनी आराम केल्यावर   आम्ही सर्वांनी आपली आगेकूच चालूच ठेवली.पुढे रस्ता थोडा निमुळता होत गेला. कडाच्या एका बाजूने काठावरून जायचा तो थरारक असा अनुभव होता तसेच इकडून रतनगड आता स्पष्ट दिसत होता. रतनगड डोंगररांगे मागून सूर्यप्रकाशाचा एक विलक्षण सुंदर असा कवडसा पडला होता. काही वेळ सरळ चालून गेल्यावर आम्हाला अजून एक चढ लागला चढ लहानसा असला तरी तिथून चढताना पायाखालील दगड सरकत होते त्यामुळे आमच्यातील अनेकांची चांगलीच तारांबळ उडत होती. एक एक करत हळू-हळू सर्वजण चढून वर गेले. एव्हाना दूर दिसणारा खुटा  सुळका आता फारच जवळ दिसत होता.  मागे असलेल्या निळ्याशार आकाशावर हिरवागार खुटा सुळका फारच विलोभनीय दिसत होता .

पुढे आम्हाला एक शिडी लागली .शिडी चढून गेल्यावर आम्ही उजवीकडे वळलो.आणि आमची आगेकूच चालूच ठेवली. दोनही बाजूला असणाऱ्या कमरेभर झुडुपातून जाताना मजा येत होती. जसजसा दूर दिसणारा रतनगड जवळ येत होता तसतसा आमचा उत्साह वाढतच जात होता . आता मात्र झपाझप पाऊले टाकत आम्ही पुढे निघालो . पुढे गेल्यावर आम्हाला सावलीचा भाग लागला. हा भाग अतिशय शांत होत. आणि तिथून समोर सुरेख असा View दिसत होता .मी मग माझी bags खाली ठेवून इकडेच थांबलो. त्या शांत वातावरणात, अंतरआत्म्याचा आवाज ऐकत  बसून समोरचे सृष्ट्री  सोदर्य न्याहाळणे हा स्वर्गीय असा अनुभव होता. इकडे आम्ही सुमारे २० मिनिटे बसलो मागून येणारे आमचे सर्व सहकारी पुढे निघून गेले तरी आम्ही इकडेच बसून होते . त्या शांत वातावरणातून निघावेसेच वाटत नव्हते . मात्र दुसरा काही इलाजच नव्हता त्यामुळे नाईलाजाने निघावेच लागले . पुढे काही पावलावरच आम्हा त्रंबक दरवाज्याकडे जाणाऱ्या प्रचंड अश्या पायऱ्या  लागल्या . ह्या सुमारे ५०-६० पायऱ्या असून ह्यातील एक एक पायरी सुमारे दीड फुटाची अहे. तसेच ह्या पायऱ्या सुमारे ८० अंशाच्या कोनात बांधलेल्या आहेत.


आम्ही मग एका मागोमाग एक असे , त्या पायऱ्या चढून गेलो. तीव्र चढ आणि उंच पायऱ्यामुळे चांगलीच धाप लागली होती पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही त्रंबक दरवाज्याजवळ पोहोचलो आणि मोहीम फत्ते झाल्याचा आनंद आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला मग आम्ही कल्याण दरवाजातून चढून वर रतनगडावर पोहोचलो . संपूर्ण रतनगडावर सोनकीच्या फुलांचा ताटवा उमलला होता . परिणामी संपूर्ण रतनगडावर पिवळ्या रंगाची चादर वसल्या सारखा वाटत होते . आमच्यातील अनेकांनी त्या फुलात फोटो काढून घेवून आपली हौस भागवून घेतली. मग आम्ही चढून वर असलेल्या नेढ्या मध्ये पोहोचलो. एव्हाना ११.३० वाजले होते. सकाळपासून चालून चालून आम्हा सर्वाना प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे सर्वांनी आपले डबे खोलून आणलेल्या जेवणावर ताव मारला. सर्वांनी आपले डबे इतरांबरोबर वाटून घेतले . जेवायला bread butter cheese sandwich, हिरवी चटणी, त्यावर चाट  मसाला शेवटी स्वीट डीश  म्हणून चोकलेट केक असा फक्कड बेत होता. जेवणं झाल्यानंतर आम्ही काही काळ तिकडे आराम करायचा ठरवलं म्हणून काही काळ नेढ्यातच थांबलो. आमच्यातील काही जणांनी तर नेढ्यातही फोटोग्राफीची संधी सोडली नाही इकडेही त्यांनी मनसोक्त फोटोस काढून घेतले . सुमारे १ वाजता मग आम्ही नेढ्यातून निघायचं ठरवलं. मग शिवाजी महाराजाची ललकारी देऊन जय भवानी जय शिवाजी म्हणत आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरु केला. नेढ्यातून उतरून आम्ही कात्राबाईच्या दिशेकडील वाटेने राणीच्या  हुड्या कडे निघालो. येथेही पावलोपावली सोनकीच्या फुलांचा सुंदर पिवळाशार असा ताटवा फुलाला होता. ``निळाशार आकाशाखाली हिरवागार डोंगर आणि त्यावर फुललेला पिवळ्या फुलांचा ताटवा ' असा माबन प्रसन्न करणार ते दृश्य होता हे निसर्गसौदर्य डोळ्यात आणी जमेल तसा कॅमेरात साठवत आम्ही पुढे निघालो.

Sudesh Adkar's photography
इकडून सरळ चालत गेल्यावर पाचच मिनिटात आम्ही राणीच्या हुड्याजवळ पोहोचलो .  गोलाकार असलेला राणीचा हुडा अनादि वर्षे उन पाऊस झेलत उभा आहे . तिकडून आम्ही सरळ चालत जावून जवळच असलेल्या कड्या जवळ गेलो . तिकडून कात्राबाईचा प्रचंड असा कडा दिसतो . सह्याद्रीचे ते अक्राळ - विक्राळ रूप बघून अंगावर कटाच उभा राहतो. मग आम्ही सावधपणे कडाच्या काठावरून झोपूनच दरीची खोली बघून घेतली.

Photo credits Avinash Phadtare
काही वेळ कड्याजवळ बसून राहिल्यावर काही वेळाने आम्ही पुढे निघालो. पुढे जावून आम्ही परत डावीकडे वळून खाली असलेल्या गुहेत पोहोचलो . इकडे पोहोचल्यावर आमच्यातील काही जण चक्क जमिनीवर आडवे होवून झोपून गेले . आम्हीही काही काळ इकडे आराम केला. इकडे गुहेत एक चहावाला होता मग आम्ही सर्वांनी एक एक चहाही घेतला. एव्हाना दुपारचे २ वाजले होते. आमच्यातील झोपलेलेही आता जागे झाले होते . मग पुढच्या पाचच मिनिटात सर्वजण तयार झाले . जग्गूने सागीतल्याप्रमाणे आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला सुरुवातीस आम्हाला एक मोठी शिडी लागली एक एक करून आम्ही ती शिडी पार केली .एक एक करून आम्ही सर्वजण खाली उतरले . आता मात्र काही जण पुढे होते तर काही जण मागे राहिले होते . आम्ही १० जण पुढे आलो होतो मग  जग्गूला आम्ही सांगितला कि आम्ही पुढे जातो आणि खाली असलेल्या ओढ्याजवळ थांबतो आणि पुढे निघालो . चढताना हत्तीप्रमाणे सावकाश चालणारे माझे सह ट्रेकर्स आता उधळलेल्या अश्वाप्रमाणे पळत होते. एका मागोमग एक ,एकमेकाशी गप्पा मारत हाहा म्हणता सुमारे अर्ध्या तासात आम्ही खाली ओढ्याजवळ पोहोचलो  आमच्यातील काही जण मग ओढ्यात हात पाय धुवायला गेले . मग मीही ओढ्यात हात पाय आणि तोंड धुवून घेतले .मग आमच्यातील काही जण पुढे निघाले तर काही जणांनी पाण्यात उतरणे पसंत केला. जरी आम्ही इकडे पोहोचले असलो तरी अजून आमच्या मागून येणाऱ्या आमच्या सह ट्रेकर्सचा काही पत्ता नव्हता. ह्या वरून एका गोष्टीचा अंदाज आला कि आपल्या कडे अजून बराच वेळ आहे . मग मी कॅमेरा आणि tripod काढून माझी सस्लो शटर  फोटोग्राफी चालू केली .मनासारखे एक दोन फोटोस मिळाल्यावर मी पुढे निघालो . कॅमेरा आणि tripod बाहेरच ठेवला होता . रस्तातून चालताना. जंगलातील त्या वाटेवरून चालताना दोन्ही बाजूला दिसणाऱ्या सुंदर दृश्याना कॅमेरात साठवत मी पुढे पुढे जात होतो . पुढे पोहोचल्यावर एका ठिकाणी मगाशी पुढे गेलेले आमचे सह ट्रेकर्स थांबलेले दिसले . त्यातील काही जण तेथे ओढ्यात अंघोळीसाठी गेले होते. इथे सुमारे गुढघाभर पाणी होते . पाणी अतिशय शांत आणि काचेसारखे स्वच्छ होते . पाण्याचा तळही  स्पष्टपणे दिसत होता मग मलाही पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही . मग कॅमेरा बाजूला ठेवून मी देखील पाण्यात उतरलो . पाणी बऱ्यापैक्की थंड होते .रणरणत्या उन्हातून थंड पाण्यात गेल्यावर अतिशय प्रसन्न वाटलं ट्रेकमुळे आलेला शीण थंड पाण्याबरोबर निघून जात होता. आम्ही सर्वानीच त्या पाण्यात मनसोक्त भिजून घेतला.


      सुमारे अर्ध्या तासाने आमचे ,मागे राहिलेले साथीदार  तिकडे पोहोचलो आम्हाला पाण्यात भिजताना पाहून तेही पाण्यात उतरले .  मग अजून काही वेळ पाण्यात घालवल्यावर आम्ही बाहेर आलो .मग कपडे बदलून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो . सरळ चालत सुमारे १० मिनिटातच आम्ही रतनवाडीत पोहोचालो .आमची बसही तिकडेच आली होती . मग आम्ही आमच्या Bags बसमध्ये ठेवल्या  आणि परत खाली उतरून जवळच असलेल्या अमृतेश्वर मंदिराकडे निघालो. काही क्षणातच आम्ही अमृतेश्वर मंदिरात पोहोचलो .अमृतेश्वर मंदिर संपूर्णपणे दगडात कोरलेले असून, ह्याची रचना हेमाडपंथी असून मंदिरात सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे.मग आम्ही अमृतेश्वराचे दर्शन घेतले .मंदिरात विलक्षण अशी प्रसन्नता आणि शांतता होती . काही काळ मंदिरात बसल्यावर आम्ही परत आमच्या बस जवळ आलो . एव्हाना सर्वजणांचे दर्शन करून झाले होते . मग आम्ही सर्व बस मध्ये चढलो आणि मग सुरु झाला आमचा परतीचा प्रवास मुंबईकडे,

आमची गाडी पुढे जात होती दूर डोंगरावर रतनगड दिसत होता , त्याला निरोप देताना मनात विचार येत होता लवकरच येवू तुझ्या भेटीला परत, तेव्हाही तू असशील इकडेच आमची वाट बघत , उनपावसाचा मारा झेलत, चंद्रसूर्याच्या साक्षीने , अनादी काळापर्यंत……